हर चेहरे पे नकाब है..

                                                      हर चेहरे पे नकाब हैं ........


     अभिनेता सुशांतसिंग राजपूत गेला...., श्रद्धांजली! आत्महत्या केली त्यानं. सगळीकडं दुःख व्यक्त झालं आणि होतंय. समाज माध्यमं व्याकुळ झाली. अनेकांना तर आपल्या घरातील कुणी गेल्याचं दुःख झालं. होणारच! कुठल्याही संवेदनशील मनाला अशा वेळी यातना होणार हे स्वाभाविक आहेच. तसं पाहिलं तर कुणाचाही प्राण जाणं ही वेदनादायी बाब आहे पण रोज शेतकरी आत्महत्या करतो तेंव्हा किती जण कळवळतात? हा सवालही समाजमाध्यमांवर उपस्थित झाला आहे. कुणीही आत्महत्या करतो ते आनंदानं नक्कीच नाही. आत्महत्या करणं म्हणजे भ्याडपणा, पळून जाणे वगैरे वगैरे बरंच काही बोललं जातं...पण हे बोलण्यापुरतं आणि पुस्तकातल्या पानात छापण्यापुरतंच असतं. ज्याच्यावर वेळ येते त्यालाच ते कळतं.
मी तर म्हणेन, आत्महत्या हे भेकडाचं नव्हे तर धाडसाचं काम आहे. पायाखाली किडा मुंगी आली तरी आपण कळवळतो तिथं चक्क स्वतःचा जीव घ्यायचं धाडस होतं, हे काही सोपं नाही. आत्महत्या करण्याचं समर्थन मी करीत नाही, अनमोल असलेलं हे जीवन असं फेकून देणं मुळीच योग्य नाही. पण असं म्हणणारेही जेंव्हा आत्महत्या करतात तेंव्हा कायम अनुत्तरित राहणारा प्रश्न उपस्थित होतो त्याचं काय? प्रत्येक माणसाच्या आयुष्यात कधी ना कधी अशी एक वेळ येते की त्याला हे जीवन निरर्थक वाटायला लागतं. कशालाच काही अर्थ शिल्लक उरलेला नसतो त्यांच्यासाठी! अर्थात अशावेळीही आत्महत्या करणं हा काही मार्ग नसतो पण त्या मानसिकतेत त्याला आत्महत्या हाच सगळ्यात सोपा मार्ग वाटू लागतो. आत्महत्येचा विचार मनात आलेले सगळेच आत्महत्या करीत नाहीत पण असं विचार सतत करणारे कधी ना कधी या मार्गाने जातात हे ही खरं!
कोण असतं हो या आत्महत्यांना जबाबदार? का उबग येतो त्याला या जीवनाचा? प्रत्येकाची कारणं वेगळी असतात. समाज माध्यमावर एक पोस्ट वाचायला मिळाली ती नक्कीच खूप काही सांगून जाते. " चेहऱ्यावर हास्य असणारा प्रत्येक माणूस आनंदी असतोच असं नाही" हे एक वाक्य सत्य सांगून जातं. पैसा, यश, कीर्ती असं सगळं काही असलं तरी आत्महत्या करतात. ज्यावेळी मानसिक आधाराची गरज असते तेंव्हा तो नाही मिळाला की हे टोकाचं पाऊल हमखास पडतं... अशा वेळी पैसा, यश मदतीला येत नाही. ज्यांनी सावरायचं असतं तेच अशावेळी जेंव्हा पाठ फिरवतात तेंव्हा अशा घटना अधिक घडतात.
अधिक संवेदनशील माणूस हा अधिक गतीनं आत्महत्येकडे जातो. 'हळवी माणसं जगायला लायक नसतात' असं एक वाक्य आहे 'चांदणे शिंपीत जा' या नाटकात. हळव्या माणसाला आजच्या दुनियेत कमालीचं त्रास होतो हे देखील सत्य आहे. दुःख पचविण्याचं साहस नसतं हळव्या माणसात. आजच्या व्यवहारी दुनियेत तर अशी माणसं एकटी पडतात. लोक त्यालाच मुर्खात काढतात त्यामुळे तर तो अधिक दिशाहीन होतो. जवळच्याच माणसांनी यातना दिल्या तर संवेदशील माणसाला त्या पचवणं नक्कीच सोपं नसतं. आज कुणी कुणाला विचारायला तयार नाही, कुणाचं दुःख वाटून घ्यायला तयार नाही. कुणाच्या कुशीत शिरून, रडून मन मोकळं आणि हलकं करावं अशी कूस उरलेली नाही. कुणाजवळ दुःख व्यक्त करायला गेलं तर तो त्याचा गैरफायदा तरी घेतो किंवा गावभर दवंडी पिटाळून अधिकच अडचणीत आणतो, पाठीमागे टिंगलटवाळी करतो. गुदमरलेल्या माणसाला आतून मोकळं होण्याची गरज असते. कोंडलेली वाफ बाहेर पडावीच लागते नाहीतर कुकर फोडून ती बाहेर येते. माणसाचंही तसाच आहे, कुणीतरी गुदमरून गेलेल्यांचं मन मोकळं करून घ्यावं लागतं...... पण इथं वेळ आणि तेवढी संवेदनशीलता आहे कुणाकडे? मनमोकळं बोलावं असं विश्वासाचं कुणी आसपास दिसतही नाही. प्रत्येकाच्या मनाची उलघाल चालू आहे पण आजूबाजूला विश्वासक कुणी दिसत नाही.
आज प्रत्येक माणूस तणावात जगतोय... त्याला 'आतून' मोकळं होण्याची गरज आहे. ज्याला त्याला फक्त आपलं दुःख दिसतं आणि दुसरा सुखात असल्याचं भासतं. असं कधीच नसतं! एकटेपणासारखा शत्रू नाही आणि इथं जो तो माणसांच्या गर्दीतही एकटा आहे. गजबजलेल्या कुटुंबातही एकटा पडलेला आहे. हे एकटेपणच हळूहळू आत्महत्येकडं घेऊन जातं. मनातला आक्रोश मनात दाबत, डोळ्यातलं पाणी काळजात दाबत ओठावर हसू आणत जगतात माणसं! इथं अश्रुंचीही हेटाळणी केली जाते. चांगल्या माणसाला इथं सहजासहजी जगू दिलं जातं नाही. कुणाच्याही परिस्थितीचा गैरफायदा घेण्यासाठी टपून बसलेली असतात गिधाडं! ज्या शिडीवरून वर चढतात त्याच शिडीला लाथेनं मारणारी अवलाद जागोजागी पाहायला मिळते. चूळ भरलेलं पाणी फेकून द्यावं इतक्या सहजतेनं माणसांनाही वापरून घेतलं जातं आणि पुन्हा त्याची ओळखही ठेवली जातं नाही.... प्रत्येक चांगल्या माणसाला इथं वापरूनच घेतलं जातं आणि फेकूनही दिलं जातं. ज्यानं दूध पाजलं त्यालाच विष पाजलं जातं .... कशाच्या आशेवर जगावं हळव्या माणसानं? 
माणसांचे खरे चेहरेच गायब झालेत.. मुखवटे लावायचे आणि पावलापावलावर ते बदलत राहायचे, यालाच दुनिया म्हणतो आपण! खोटेपण, ढोंग, स्वार्थ यापेक्षा काही उरलंय काय? स्वार्थाची नाती आणि नात्यात स्वार्थ.... अर्थात सारी दुनियाच बेईमान आहे असं नाही. बोटावर मोजता येतील एवढेच काही सज्जन अजून आहेत या दुनियेत. म्हणूनच अजूनही जगाचा गाडा चालतोय. पण एकंदर परिस्थिती पहिली तर खूप खूप विदारक आहे मित्रानो. अहो हल्ली कुणाला मित्र म्हणायचंही धाडस होत नाही. कुणासाठी काही करायला जावं तर ती इच्छाही होत नाही. उलटी तंगडी केलेली अगणित कुत्री आजूबाजूला दिसायला लागतात आणि मग चांगल्या माणसालाही चांगुलपणा विसरावा लागतो..... डोळे झाकून विश्वास ठेवावा असं विश्वासक काही दिसतंय का हो काही अवतीभवती? मग येते निराशा आणि त्यापाठोपाठ आत्महत्येचा विचार! कुणी आत्महत्या केली की अनेक तथाकथीत विचारवंत लेक्चर द्यायला सरसावतात. अरे आधी कधीतरी एखाद्याची ढासळलेली मनस्थिती सावरायचा प्रयत्न करा... कदाचित नाही आत्महत्या करणार तो! माणूस जग सोडून गेल्यावर तुमचं भाषण नाही येत कामाला..... जोपर्यंत मुखवट्याची दुनिया आहे तोपर्यंत आत्महत्या होतंच राहणार आहेत....... 'ज़िंदगी जीने को एक यहाँ ख्वाब मिलता है; यहाँ हर सवाल का झूठा जवाब मिलता है; किसे समझे अपना किसे पराया; यहाँ हर चेहरे पे एक नकाब मिलता है' तसं पाहिलं तर हा खूप मोठा आणि चिरंतन विषय आहे. मोजक्या शब्दात बांधण्याएवढा मर्यादित नक्कीच नाही.... माणूस माणसासारखा जगला वागला तर आणि तरच सगळ्यांचं भलं आहे पण हे भलं नक्की हवंय तरी कोणाला? मुखवट्याची दुनिया सारी ...! शेवटी एकच ..... 'दो जासूस' चित्रपटातील एका गाण्याच्या ओळी आत्मसात करून जगायचं!
                                           दो जासूस करे महसूस, 
                                          के दुनिया बडी खराब है, 
                                          कौन है सच्चा, कौन है झूठा , 
                                          हर चेहरे पे नकाब है.. 
                                         जरा सोचो, जरा समझो.. 
                                         जरा संभालकें रहियो जी ..........!

                                                                                                               - अशोक गोडगे

Comments