श्रीमंत मनाचा भिकारी
माणूस गरीब असला की त्याला नाती गोती काही नसतात! मित्रमंडळी, पाहुणे रावळे या सगळ्यापासून तो खूप दूर असतो! माणूस जन्माला आला की जन्मासोबत नातीही जन्माला येत असतात पण त्याचा खिसा रिकामा झाला की जवळच्या माणसांची मनंही रिकामी होतात. कुणी मोठा माणूस असला की बळजबरीनं त्याच्याशी नातं सांगतात, कुणी म्हणतं "हे माझे वर्गमित्र" कुणी म्हणतं आम्ही बालमित्र ! कसलाच काही संबंध नसतो पण बळजबरीचं नातं जोडतात आणि आपले आईवडील अडगळीला टाकतात. चुकून कुणा तथाकथित मोठ्या माणसासोबत असताना फ़ाटका बाप जवळ आला तर त्याला ओळख द्यायला तयार होत नाहीत त्यांनीच वाढवलेली मुलं ! घरातला कुणी नौकर आहे असं सांगायलाही मागे पुढे पाहत नाहीत. फाटक्या कपड्यातला आणि तुटक्या चपलेतल्या बापाला 'बाप' म्हणायची लाज वाटते हो ! मुलाला लहानाचं मोठं करता करता त्याच्या अंगावरच्या कपड्याने ठिगळ लावायलाही त्याला उसंत मिळालेली नसते आणि याच्यावर एवढे पैसे खरंच केलेले असतात की, तुटलेली चप्पल शिवायलाही त्याच्या फाटक्या खिशात दहा वीस रुपये उरलेले नसतात. पण त्याला काय? खोट्या दुनियेत वावरताना त्याला आपला खरा बापही खोटा दाखवावा लागतो .... क्या करे, यही तो है दुनिया और ये ही है दुनियादारी !
माेहिते नावाचा एक माणूस! शरीरानं तसा उंचापुरा अन् काटक.! तसा वयस्करच पण मजबूत..या वयातही आवाज मात्र पहाडी! तसं पाहिलं तर भिकारी म्हणूनच याची ओळख. कष्टकरी आणि भिकारी अशा दाेन्हीही रूपात त्याचं आस्तीत्व दिसायचं . एकेकाळी या माेहिते नावाच्या कथित भिकाऱ्याचं माेठ्ठं वैभव हाेतं असंही सांगितलं जायचं!
माेहिते नावाचा एक माणूस! शरीरानं तसा उंचापुरा अन् काटक.! तसा वयस्करच पण मजबूत..या वयातही आवाज मात्र पहाडी! तसं पाहिलं तर भिकारी म्हणूनच याची ओळख. कष्टकरी आणि भिकारी अशा दाेन्हीही रूपात त्याचं आस्तीत्व दिसायचं . एकेकाळी या माेहिते नावाच्या कथित भिकाऱ्याचं माेठ्ठं वैभव हाेतं असंही सांगितलं जायचं!
-- तर हा भिकारी वाटणारा माेहिते आपल्याच ‘दुनियेत’ रमणारा, लाकूडफाटा ताेडून विकायचा अन् हातात दाेन पाच रूपये आले की हातभट्टीची दारू प्यायची अन् भीक मागून भूक भागवायची.. बस्स, हाच त्याचा दिनक्रम! दारू पिऊन रस्त्यावरून निघाला की, खड्या आवाजात ‘स्वगत’ म्हणत जाणारा हा माेहिते.. . हे ‘स्वगत’ म्हणजे नशेतली बाष्कळ बडबड नसायची... ऐकत रहावं वाटायचं. कधी ताे भारत- पाकीस्तान संबंधाबध्दल बाेलायचा तर कधी नेतेमंडळी, राजकारणांवर जळजळीत भाष्य करायचा! मधूनच कधी जाम सटकायचा अन् आपल्या नातेवाईकांच्या नावानं जाेरजाेरानं शिव्या हासडायचा! त्यात त्याची वेदना आणि घुसमट दिसायची पण कुणी त्याकडं लक्ष देत नसायचं! ‘मी भिकारी तर माझं सारं खानदान भिकारी..., मला भिकारी केलंय, देव ह्या सगळ्यांना भिकारी करणार.., त्यांनी भीक मागितलेली मी माझ्या डाेळ्यांनी बघणार आणि मगच मी मरणार...!’ असं ताे म्हणायचा अन् शिव्या घालता घालता त्याचा कंठ दाटून यायचा... डाेळेही पुसायचा..!!
भाकरीसाठी राेज कुणाचीतरी दारं शाेधणारा हा माेहिते मला एकदा एका शाही लग्नसाेहळ्यात दिसला. थाटामाटातला लग्नसाेहळा, सुटाबुटातले वऱ्हाडी, अलीशान गाड्यांची गर्दी... सगळं काही दिमाखदार..! या झगमगाटात एका बाजूला हा माेहिते शांत उभा.. अंगावरचे फाटके कपडे, वाढलेली दाढी... जाे यायचा, ताे त्याला हुसकाउन लावायचा.. साहजिकही आहे, अशा शाही समारंभात एका सामान्य भिकाऱ्याला हीच वागणूक मिळणार! कुणी म्हणायचं, ‘सांभाळा... काही तरी उचलेल हा..’ तर कुणी म्हणायचं, ‘पाहुणे जेवायच्या आधी भिकारडी हजर बघा!’... बरंच काही.., माेहिते मात्र या झगमगाटाकडे पहात हाेता, त्याची नजर काही शाेधत हाेती, आणि म्हणूनच संशयाची पाल अधिकच चुकचुकत हाेती.
शेवटची मंगलाक्षता झाली, बाहेर फटाके फुटले, नयनरम्य आतषबाजी हाेती ती! बाजूला जेवणाच्या पंगतीची लगबग सुरू झाली..., माेहिते तिथून निघून जाऊ लागला तेवढ्यात गगर्दीतून वाट काढत नवरी त्याच्याजवळ आली...या भिकाऱ्याचे पाय धरून आशीर्वाद घ्यायला लागली.. एवढा वेळ शांत असणारा हा भिकारी घाबरला अन् दुसऱ्याच क्षणी त्याच्या डाेळ्यातून घळघळा पाणी वाहू लागले. ‘अगं अगं पाेरी, लाेकं बगत्यात... नावं ठेवत्याल तुला..!’ असं म्हणत हा भिकारी मागं सरकू लागला पण तेवढ्यात नवरीनं त्याच्या पायावर डाेकं ठेवलंही! भिकाऱ्याच्या बांध फुटला. ‘अगं पाेरी.... मी भिकारी.... तुला द्यायाला कायबी न्हाय माझ्याजवळ... पण माजं आशीर्वाद हाईत लेकरा..!’ असं म्हणत त्यानं मान वळवली. सगळ्या हायफाय वऱ्हाडींच्या नजरा इकडंच हाेत्या. त्या नजरा पाहून हा भिकारी म्हणाला, ‘माज्या भावाची पाेरगी हाय ही... लहानपणी अंगाखांद्यावर खेळलीया... बगा की, समदी इसारली पर ही पाेर न्हाय इसारली मला...!’ अन् माेहिते नावाचा हा कथित भिकारी आपल्या फाटक्या सदऱ्यान डाेळं पुसत निघून गेला...भीक मागण्यासाठी.... शाही पक्वांन्नांच्या पंगतीकडे पाठ फिरऊन ...!



अतिशय उत्तम भावनिक पोस्ट आहे
ReplyDeleteअतिशय उत्तम भावनिक पोस्ट आहे, या वरून एक लक्षात येते की पैसा असलेला माणूसच श्रीमंत नसतो परंतु ज्याच्याकडे मनाची श्रीमंती असते तोच खरा जगातला सुखी आणि श्रीमंत माणूस असतो
ReplyDeleteधन्यवाद!
ReplyDelete