हरवलेत ‘गुरूजी’ अन् बेपत्ता ‘विद्यार्थी ’...!
‘सर, हे घ्या पेढे!’ कालच संध्याकाळी एक गुरूजी, (अर्थात आजच्या भाषेतले शिक्षक) घरी आले अन् माेठ्या आनंदानं पेढे द्यायला लागले. आता पेढे म्हणजे नक्कीच आनंदाची बातमी! मी आपलं विचारलं, काय हाे गुरूजी, ‘मुलगा झाला काय?’ गुरूजी छाती फुगवत म्हणाले, ‘नाही हाे... मला ‘शिक्षक दिनाचा’ पुरस्कार मिळालाय... त्याचे हे पेढे!’ त्यांचं अभिनंदन तर करायलाच हवं हाेतं.. मी ते केलंही पण त्यांच्या जवळ जाताच भपकन् वास आला... दारूचा हाे! गुरूजींना विचारलं, ‘अहाे, हे काय?’ गुरूजी हसत म्हणाले, ‘काही नाही हाे.. आमच्या सगळ्या शिक्षक मित्रांनी पार्टी मागितली... ‘घेतली’ आपली थाेडीशी!’ कसलाही अपराधी भाव नव्हता या ‘गुरूजी’ च्या चेहऱ्यावर !
मला माझ्या लहानपणीचे गुरूजी आठवले. धाेतर नाहीतर पायजमा... चेहऱ्यावर सतत सात्विक भाव! अख्खा गावगाडा त्यांच्याच म्हणण्याप्रमाणं चालायचा! गावातले सगळे महत्वाचे निर्णय हे ‘गुरूजी’ घेत अन् सारं गाव त्याला मान्यता द्यायचं. आता धाेतर गेलं, पायजमा गेला... जीन पॅट, शर्टचा जमाना आला.. हाेय, गुरूजींनाही आता तेच आवडायला लागलं... कपडे बदलले इथवर ठीक पण आचार, विचार, संस्कारही! शिक्षकांनीच आपल्या अल्पवयीन विद्यार्थिनीवर बलात्कार केला किंवा विनयभंग केला... राेज वाचताे आपण वर्तमानपत्रात! हे ‘गुरूजी’ काय? नाही हाे! गुरूजी केंव्हाच हरवलेत... अर्थात सन्मान करावा असे गुरूजी आजही दिसतात पण संख्यात्मक किती? गरीब हुशार मुलांच्या शिक्षणाचा खर्चही आपल्या पगारातून भागवणारे गुरूजी आजही आहेत.
माझ्या एका मित्राचा मुलगा.. महाविद्यालयात जाणारा पण कधीही तंबाखू गुटखा न खाणारा.. त्याच्या खिशात एकदा त्याच्या आईला तंबाखू अन् चुना सापडला. साहजिकच आईनं विचारलं तर ताे म्हणाला, ‘नाही गं आई, आमचे सर वर्गात शिकवता शिकवता मध्येच मागतात म्हणून मी जवळ ठेवताेय!’ हाेय, माेठ्या विद्यार्थ्यांकडं तंबाखू मागणारे अन् त्यांच्यासाेबत दारू पिणारे शिक्षकही मी पाहिलेत.. अगदी जवळून! हीच का गुरू परंपरा? पूर्वी गुरूंच्या घरी जाऊन पाेरं शिकायची... गुरूकुल म्हटलं जायचं त्याला.. आता बापाच्या पैशावर गुरूजींनाच घरी बाेलवण्याची परंपरा श्रीमंतांकडे सुरू झालीय!
शिक्षक म्हणजे एक आदराचं, सन्मानाचं स्थान, देवासारखं पुजण्याचं स्थान! ते समोर दिसले की आदरानं आपोआप मान खाली झुकावी असं स्थान! मोजक्या काही शिक्षकांच्या वर्तनानं हे स्थान नष्ट होऊच शकत नाही. शिक्षक या शब्दाची महानता चिरंतन टिकणारी आहे. गुरु शिष्यातलं नातं कुठल्याच तराजूत नाही तोलता येणार ! शिक्षक म्हणजे केवळ शाळेत शिकविणारेच नव्हे, समाजात, कुठल्याही क्षेत्रात आपल्याला काही शिकवतो ते सारे शिक्षकच असतात! शाळा महाविद्यालयात शिकविणाऱ्या काही मोजक्या शिक्षकानं मर्यादेची रेषा नक्कीच ओलांडली आहे, पण नितीमत्ता जपणारे आणि आपल्या शिक्षकी पेशाचं भान ठेऊन समाजात वावरत असलेले चांगले शिक्षक आजही आहेतच की ! शिक्षकाच्याच नावानं नुसतं कोकलतो आपण , पण विद्यार्थी आणि पालक तरी कुठं मर्यादेच्या आत आहेत?
शिक्षक म्हणजे एक आदराचं, सन्मानाचं स्थान, देवासारखं पुजण्याचं स्थान! ते समोर दिसले की आदरानं आपोआप मान खाली झुकावी असं स्थान! मोजक्या काही शिक्षकांच्या वर्तनानं हे स्थान नष्ट होऊच शकत नाही. शिक्षक या शब्दाची महानता चिरंतन टिकणारी आहे. गुरु शिष्यातलं नातं कुठल्याच तराजूत नाही तोलता येणार ! शिक्षक म्हणजे केवळ शाळेत शिकविणारेच नव्हे, समाजात, कुठल्याही क्षेत्रात आपल्याला काही शिकवतो ते सारे शिक्षकच असतात! शाळा महाविद्यालयात शिकविणाऱ्या काही मोजक्या शिक्षकानं मर्यादेची रेषा नक्कीच ओलांडली आहे, पण नितीमत्ता जपणारे आणि आपल्या शिक्षकी पेशाचं भान ठेऊन समाजात वावरत असलेले चांगले शिक्षक आजही आहेतच की ! शिक्षकाच्याच नावानं नुसतं कोकलतो आपण , पण विद्यार्थी आणि पालक तरी कुठं मर्यादेच्या आत आहेत?
पुर्वीसारखे शिक्षक राहिले नाहीत अशी नुसती ओरड तरी काय कामाची? त्याकाळातले पालक अन् विद्यार्थी तरी कुठं उरलेत हाे आज? आपल्या गुरूजींचा सन्मान करायचा असताे याचाच मुळी विसर पडलाय ना! ‘छडी लागे छम् छम्.. विद्या येई घम् घम्’ असं आमच्या शाळेच्या दिवसांत म्हटलं जायचं. आता गुरूजींनी छडी मारली की त्यांच्यावर फाैजदारी झालीच म्हणून समजा! अर्थात अलीकडं काही शिक्षक विद्यार्थ्यांना अमानुषपणे मारतात हे समाेर आलेलंही आहे, त्याचा कुणीही निषेधच करील, पण विद्यार्थ्यांना शिक्षकांचा धाक तर हवाच ना! परवा एका गुरूजींनी एका विद्यार्थ्याला शाळेचा वर्ग झाडायला सांगितला. त्यानंही ताे झाडला खरा पण त्याला म्हणे अपमान वाटला! मग काय, दुसऱ्या दिवशी त्याच्या धनाड्य बापानं शाळेत हजेरी लाऊन बिचाऱ्या त्या गुरूजींची चांगलीच ‘हजेरी’ घेतली. मुख्याध्यापकांनी माफी मागितली तेंव्हा कुठं प्रकरण शांत झालं! काही वर्षांपूर्वीपर्यंत शाळेतली पाेरं पाेरी शेण पाणी आणून शाळेचा वर्ग सारवत हाेते. आम्हीही या काळात शाळेत झाडू मारलेत ! त्यात काय ? गुरुजींनी शाळा झाडाची अशी कुणाची अपेक्षा असेल तर माहित नाही बुवा ! आम्ही हे करीत होतो तेंव्हा पालक काैतुक करीत हाेते. आजही अनेक पालक असे सुज्ञ आहेत.
मला आठवतंय, दरवर्षी शाळेच्या पहिल्या दिवशी माझे वडील मला घेऊन शाळेत यायचे अन् म्हणायचे, ‘गुरूजी, पाेरगं तुमच्या हवाली केलंय...मारा, झाेडा..पण पाेरगं शिकलं पाहिजे!’ परवा एका शाळेत असाच वाद झाला. शाळकरी पाेरानं शाळेतच गुटख्याचा ताेबरा भरला. गुरूजी संतापले आणि त्याला फटके देऊन घरी पाठवलं. बापाचा पारा चढला अन् या दिवट्याला घेऊन ताे थेट वर्गात घुसला. गुरूजी काही बाेलायच्या आधीच ताे म्हणाला, ‘मास्तर, आम्ही कवा हात न्हाय लावला आमच्या लेकराला... तुम्ही काेण? माझं पाेरगं गुटखा खाईल न्हायतर दारू ढाेसंल.. तुम्हाला तर पैसं मागत न्हाय न्हवं? उगं पगारापुरतं काम करा, सांगून ठेवताेय!’ हे सगळं असंय बघा! शंख तरी नक्की कुणाच्या नावानं करावा?
- अशाेक गाेडगे (कदम)
- अशाेक गाेडगे (कदम)




Comments
Post a Comment