--- कव्वे काे ‘बाप’ बनायें..!



 गेल्या काही दिवसांपासून पक्ष पंधरवड्याच्या निमित्तानं  दिवंगत आई बापाला जाम मेजवानी चालू आहे. पक्ष पंधरवडा आला की हे सगळं आलंच! परंपरा, रिवाज वगैरे सगळं ठिक आहे हाे, पण यातील किती जणांनी आई बाप हयात असताना त्यांना जपलंय ते पहा एकदा! मेल्यावर त्यांच्या नावानं कावळ्यांना खाऊ घालण्यापेक्षा जिवंतपणी आई बापाला घाला ना..! त्यांना कधी चटणी भाकरी दिली नाही अन् कावळ्यांना लाडू, पुरणपाेळी! या म्हाताऱ्यांना खाण्यापिण्यापेक्षा अन् पैशापेक्षा हवं असतं तुमचं प्रेम.. अन् ते मिळतच नाही. श्राध्दाला मात्र सगळं काही! कावळ्यांना देता तेवढं जरी आधीच आई बापाला दिलं असतं तर? संत तुकाेबा म्हणतात,
                    ‘भुके नाही अन्न,
                    मेल्यावरी पिंडदान...
                   हे ताे चाळवाचाळवी,
                   केली आपणाची ठेवी’
 माणूस गेल्यावरच त्याची किंमत  कळते. काही जण दुनियेला दाखविण्यासाठीही आपण आपल्या वृध्द माता पित्याला सांभाळत असल्याचं दाखवतात. दारूसाठी आईच्या डाेक्यात दगड घातलेले अन् जमीनीसाठी बापाचा खून करणारे पुत्रही काही कमी नाहीत ना या दुनियादारीत! नवी काेरी गाडी घ्यायची, गाडीवर ‘आई तुझा आशीर्वाद’, ‘आई, थाेर तुझे उपकार’ असं काही लिहायचं. हा उडवताेय गाड्या अन् आई जातेय कुणाच्यातरी शेतात माेलमजुरीला..! दुसऱ्याची आई कुठंतरी भीक मागून पाेट भरतेय किंवा असते कुठल्यातरी वृध्दाश्रमात!. आजच्या दुनियादारीत ‘श्रावणबाळ’ हरवलाय हाे! पण तरीही आई वडीलांची मनापासून सेवा करणारी मुलंही पहायला मिळतात. सगळंच काही वाईट चाललंय असं नाही पण म्हाताऱ्या आईवडीलांचा सांभाळ करण्यासाठीही आज कायदा करावा लागताेय हे चक्रावणारं नाही काय?
 म्हाताऱ्या बापाकडं चार पैसे असले की त्याला गॉड बोलत राहायचं, त्याचं किडुक मिडूक असेल ते विकून त्या पैशावर मज्जा मारायची आणि बाप रिकामा झाला की मग आपोआपच त्याची किंमत शून्य होते. पुन्हा त्याला जवळ केलं जात नाही उलट त्याचं म्हातारपण हेच एक ओझं वाटायला लागतं! म्हाताऱ्या बापाला ओरबाडून खाणारे आणि रस संपला की चोथा फेकून देणारे असे ढीगभर दिवटे चिरंजीव मी ओळखतो. मरेपर्यंत आई बापाची उपासमार करतात आणि ते गेल्यावर त्यांच्या नावानं पक्वान्नाचं ताट छतावर ठेऊन कावळ्याची वाट पाहत बसतात!  
 आमच्या आबासाहेबांनी (ऍड. धनंजय माने ) सांगितलेला त्यांच्या परिचयातील माणसांचा एक बाेलका किस्सा! अकाली पतीचं निधन झाल्यावर माेठ्या हलाखीत त्या आईनं यातना सहन करीत दाेन मुलांना वाढवलं, शिकवलं. आई म्हातारी झाली, मुलं वेगळी झाली. या म्हाताऱ्या आईला सांभाळायचं कुणी? दोन भावात तेवढ्यावरून वाद सुरु झाला. शेवटी पंधरा पंधरा दिवस दाेघांनी सांभाळायचं ठरलं! एकदा एक भाऊ  परगावी गेला आणि परतायला तीन दिवसांचा उशीर हाेता. पहिल्या भावानं त्याला फाेनवर सांगितलं, माझ्याकडील पंधरा दिवस भरत आलेत, 'तीन दिवस उशीर बिशीर तसलं काही सांगायचं नाही.. पंधरा दिवस झाले की आईला तुझ्या दारात आणून टाकताे. तुझं तू बघ!’ ठरलेल्या पंधरा दिवसांपेक्षा एक दिवस जादा आईला घरात ठेवायला तयार नव्हता. 
     काही काळ गेला. त्या आईचा एक दिवटा आबासाहेबांना कुठंतरी भेटला. त्यानं घरी येण्याचा आग्रह केल्यानं आबासाहेब गेले पण त्यांनी तेथे चहा घेणंही टाळलं. त्याच्या घरात गेल्यावर आबासाहेबांना त्याच आईचा माेठा हार घातलेला फाेटाे दिसला अन् टाेलेजंग बंगल्याला नाव दिलेलं हाेतं, ‘मातृ पितृ छाया!’ दिवस मोजत आईला त्या घरात राहावं लागत होतं! बंगल्यावर मात्र अक्षरे झळकत होती, 'मातृ पितृ छाया' ! सगळं लोकांना दाखविण्यासाठीच ना?
 चाललाय ‘पितृपक्ष’.. या दिवसांत म्हणे काही शुभकार्य  करायचं नसतं. दरवर्षी येणारे हे पंधरा दिवस म्हणजे अशुभ कालावधी!. आपले पूर्वज आपल्या घरी येतात अशी भावना आहे ना.?. मग हे दिवस अशुभ कसे मानले जातात? या पंधरवडयात दिवंगत पूर्वजांना जेवायला घातलं जातं. जिवंत असताना आई बापांना उपाशी ठेवणारे महाभाग या दिवसात मात्र पक्वान्न करून कावळ्यांना भरवतात. आई वडिलांना जे आवडत होतं ते आठवून आठवून, यादी करून पक्वान्न तयार केली जातात. कावळ्याला घालतात तेवढं काही आईबाप जिवंत असताना घातलं असतं तर ----!. यावरूनच परवा मित्रांत बाेलताना सहज विषय निघाला हाेता, माझ्या एका मित्रानं यावेळी एक धक्कादायक माहिती दिली. त्याच्या एका मित्रानं आई बाप समजून कावळ्यांना जाम मेजवानीच दिली. काही मित्रांनाही जेवायला घातले. आई वडीलांच्यावर असलेल्या कथित भक्तीचे बरेच गाेडवे गात हाेता. पण माझाच एक मित्र साक्षीदार हाेता सगळ्या घटनांचा! हा कुपुत्र वृध्द आईला काठीने मारत हाेता. बापानं बांधलेल्या घरातून बाहेर काढलं होतं,  आईला अंगणातल्या खाेपटात रहावं लागत हाेतं अन् राेज याच मुलांकडं भाकरीची भीक तिला मागावी लागत हाेती. कधी मिळायचं तर कधी उपाशी झाेपायचं! आता मात्र तिच्या नावानं पक्वान्न करून कावळ्याच्या घशात! व्वा..! आईला वेळेवर चहा कधी दिला नाही अन् आता ‘कावळ्याच्या घशात बासुंदी!’ जिवंत माता पित्यांना भाकरीच्या तुकड्यासाठी तरसावं लागतं अन् आता घराच्या छतावर पक्वान्न ठेवत कावळ्यांचं पाेट भरलं जातं..! संत कबीर म्हणतात,
‘जीते बाप काे राेटी नां दे, 
मरें बाद क्यूं पछतायें? ...
        मुठ्ठीभर चावल झाेककर धाबेपें,
कव्वे काे बाप बनायें!’
    
- अशाेक गाेडगे (कदम)

'दुनियादारी' या वेब पोर्टलवरून प्रसिद्ध होणारा मजकूर, अथवा त्याचा काही भाग, छायाचित्र, ध्वनिचित्रफीत आदी कशाचाही पूर्वपरवानगीशिवाय वापर करू नये. तसे निदर्शनास आल्यास कॉपीराईट कायद्याचा भंग समजला जाईल. सर्व हक्क राखून ठेवलेले आहेत. - अशोक गोडगे, सोलापूरे नगर, टाकळी रोड, सोलापुरे नगर पंढरपूर भ्रमणध्वनी : ९४२१०२८०८०, ७०२००००६३७ . ,

Comments

Post a Comment