पराभवच ..., पण कुणाचा ?

    
  दुनियादारी 
  रेल्वे स्टेशन जवळ आल्यामुळं तसा रेल्वेचा वेग बराच कमी झाली हाेता परंतु मध्येच करकच्चून ब्रेक दाबत रेल्वे एकदम थांबली. काय हाेतंय हे कळायच्या आधीच रेल्वेतील प्रवाशी एकमेकांच्या अंगावर पडले तर वर ठेवलेले कुणाचे सामान कुणाच्या अंगावर पडले. दरम्यान रेल्वे इंजिनाच्या समाेर गर्दी जमू लागली हाेती. साधारण ४५ वर्षांचं वय असणारा एक उंचापुरा, धिप्पाड माणूस रेल्वेरूळावर आडवा पडलेला! त्याला आत्महत्या करायची हाेती. रेल्वे थांबली नसती तर एव्हाना सगळंच संपलेलं असतं!    
 ‘मरायला हीच जागा सापडली का?.. आधीच गाडी तासभर लेट झालीय!’ गर्दीतल्या एकानं त्याला खडसावलं ताेवर दुसरा म्हणाला, ‘आरं मंग लायटीच्या खांबावर चढायचं की!’...जाे ताे त्याला आत्महत्या करण्याचे वेगवेगळे मार्ग सांगत हाेता.., ताे मात्र शांत! एकटक नजर, निर्वीकार..! गाडीला आणखी उशीर हाेताेय याची प्रवाशांना चिंता.. गर्दी बाजूला सारत मी पुढं गेलाे, त्याच्या डाेक्यावरून मायेचा हात फिरवला आणि त्याचा हात धरून त्याला बाजूला घेतलं... माझ्या स्पर्शातला ‘आपुलकीचा ओलावा’ त्याला जाणवला असेल बहुतेक! 
===========================
  त्याला रेल्वेत बसवलं. मी त्याच्या शेजारी बसून राहिलो. एखादी प्रेक्षणीय वस्तू असल्यासारखं डब्यातली लोक त्याच्याकडे पाहत होती तर कुणी त्याला उपदेशाचे डोस पाजत होते. कुणी टिंगल करीत होतं तर कुणी टवाळी ! ज्याला जसे वाटेल तसे प्रश्नही विचारत होते, तो मात्र कुणालाच काही बोलत नव्हता, त्यांचा आवाज त्याच्या कानापर्यंत तरी जात होता की नाही हे देखील कळत नव्हतं ! मी मात्र त्याचा हात हातात घेऊन शांत बसलो होतो. रेल्वे स्टेशन आलं ... उतरताच स्टेशन मास्तरकडून त्याच्याविरोधात काही हालचाली सुरु झाल्या. ओळखीचा फायदा घेऊन त्याला घेऊन मी स्टेशनबाहेर पडलो.  
 आम्ही दाेघं मिळून रस्त्यानं चाललाे हाेताे.. अगदी हातात हात घालून. निशब्दपणे! त्याला एका हाॅटेलात आणलं, ‘काही खाणार का?’.. एवढं मी विचारताच, ‘साहेब, पैसं नाहीत माझ्याजवळ!’ असं म्हणत त्यानं डाेळे पुसले. त्यानं काही खाल्लं नाही पण एक कप चहा घेतला. त्याचं गप्प राहणं हे धाेक्याचं हाेतं.., आत्महत्या करण्याचा त्याचा निर्धार अजूनही कायम असल्याचं जाणवत हाेतं. माणूस चिडला, भांडला, रागावला तरी बरं असतं! त्याच्या 'आत' कोंडलेली वाफ तरी निघून जाते आणि आतून तो हलका तरी होतो ! संकटात अथवा दुःखात माणूस शांत राहणं हे हमखास धोक्याचं असतं ! हा तर असाच शांत शांत !
  -- त्याला मी माझ्या ऑफिसमध्ये आणलं. माझ्यासाठी आणलेला जेवणाचा डबा त्याला दिला आणि  जेवायला घातलं. नको नको म्हणत त्यांना अधाशासारखं जेवण केलं. काही वेळ एकटक शून्यात फ़ार राहिला आणि त्याच्या डोळ्यातून अश्रू ओघळायला लागले.  ‘साहेब, तुम्ही काेण?..कुठले? तुमचा माझा काय संबंध? माझ्यासाठी एवढं का करताय..? मला जगायचं नाही..’ असं म्हणत ताे रडत हाेता.., मी गप्पच! ‘जगून तरी काय करू? वीस वर्ष झालं, कोर्टातला जमीनीचा वाद काही संपेना..!’ हळूहळू काेंडलेली वाफ बाहेर येत हाेती.. तेच हवं हाेतं मला! सांगाेला तालुक्यातल्या एका खेड्यातला हा तात्या.. साखर कारखान्यावर चांगल्या पगाराची नाैकरी, घरी बायकाे, दाेन मुलं.. सगळी माहिती मिळत हाेती.. ‘साहेब, तुम्ही काहीही करा, पण मी हितनं गेलाे की कुटंतरी मरनारच हाय!’ असं सारखंच ताे म्हणत हाेता. जमीनीच्या तुकड्यासाठी हा अनमाेल जीव गमाऊन लेकराबाळांना पाेरकं करणार? जमीन कधीही मिळेल पण हा जीव? त्याला विश्वासात घेत चांगलं तासभर समजावलं...विचार करीत त्याचा डाेळा लागला. दाेन तासांनी जाग आली तेंव्हा ताे माझ्याजवळ येऊन ओक्साबाेक्शी रडायला लागला..., ‘साहेब, तुमच्यामुळं वाचलाे, सगळं संपलं असतं माझं... डाेस्क्यात उजेड पडला माज्या ...आता नाही मरणार...!’ माझ्या डाेळ्यात पाणी आलं अन् एका विजयाची चमकही! माझे सहकारीही सुखावले हाेते. एक जीव, एका घराचा आधार वाचवला हाेता मी... जग जिंकल्याचा आनंद हाेता मला. आपल्या हातून काही चांगलं घडलं या विचारात मी वेगळ्याच दुनियेत रमलाे हाेताे.  
   पाच सात दिवस झाले असतील.. माझा एक सहकारी धावतच आला. म्हणाला, ‘त्या दिवशी तुमच्यासाेबत आलेल्या त्या माणसाची डेड बाॅडी आणलीय पाेष्टमार्टेमसाठी! घरातच गळफास घेतलाय त्यानं!’ ...जीवनाच्या संघर्षात त्याचा पराभव झाला हाेता की, त्याला समजावण्यात मीच कमी पडलाे हाेताे? पराभवच..! पण कुणाचा?? त्याचा की माझा? एवढी वर्ष गेली पण या प्रश्नाचं उत्तर आजही नाही मिळालं!
- अशाेक गाेडगे (कदम) 

'दुनियादारी' या वेब पोर्टलवरून प्रसिद्ध होणारा मजकूर, अथवा त्याचा काही भाग, छायाचित्र, ध्वनिचित्रफीत आदी कशाचाही पूर्वपरवानगीशिवाय वापर करू नये. तसे निदर्शनास आल्यास कॉपीराईट कायद्याचा भंग समजला जाईल. सर्व हक्क राखून ठेवलेले आहेत. - अशोक गोडगे, सोलापूरे नगर, टाकळी रोड,पंढरपूर भ्रमणध्वनी : ९४२१०२८०८०, ७०२००००६३७ . ,

Comments

Post a Comment