साॅरी ‘आमिताभ’ जी..!

 

दुनियादारी 

  ‘हे घ्या पेढे! पाेरानं नांव काढलं बगा.... चांगलं अठठयाएेंशी टक्के मार्क  मिळऊन पाेरगं पास झालं!’ आमचा एक मित्र भल्या सकाळीच येऊन माझं ताेंड गाेड करीत हाेता... मधुमेहाचा आजार असला तरीही मी त्यातला अर्धा  पेढा टाकला ताेंडात... कुणाच्या आनंदात आपण कशाला विरझण घालायचं? आमचा हा मित्र आपल्या पुत्राचे गाेडवे गात हाेता..., वाटलं, चांगली गाेष्ट आहे, असेल ह्याचा मुलगा हुशार! आमच्या गप्पा चालल्यात तेवढ्यात अजून एक मित्र हजर! एका शाळेतला हा शिक्षक.. त्यानंही त्याच्या मुलाच्या काैतुकाचे पेढे दिले अन् त्याच्या आधी आलेल्या आमच्या या मित्राला समजाऊ लागला...‘नका नाराज हाेऊ.. पुढच्या वर्षी हाेईल पास तुमचा मुलगा..’ आमचा हा मित्र जाम उघडा पडला हाेता... पाेरगं नापास हाेऊनही दुनियेला दाखविण्यासाठी ही किती लबाडी! दुनियेला फसवताेय असं वाटून घेणारी ही मंडळी स्वत:च फसतात हाे..!   
  आमच्या एका धार्मिक चित्रपटाचं चित्रीकरण पंढरपुरात करायचं हाेतं. चित्रपट धार्मिक असल्यानं महिला कलाकार ही प्रेक्षकांच्या परिचयाची नसावी असा निर्मात्याचा आणि माझाही आग्रह हाेता. एका मित्रानं सुचवल्यानुसार निर्मात्यानं फाेनवरून संपर्क  करून या महिला कलाकारास निश्चित केलं हाेतं. चित्रीकरणाच्या आदल्या दिवशी या ‘मॅडम’ पंढरीत दाखल झाल्या. त्यांच्या आग्रहाखातर सुसज्ज महागडं लाॅज बुक केलं गेलं. निर्मात्यांच्या इच्छेनुसार सायंकाळी आम्ही त्यांना भेटायला गेलाे. अहाे, काय रूबाब या ‘मॅडम’ चा! बड्या बड्या अभिनेत्या - अभिनेत्रींसाेबत मला काम करायला मिळालं पण हे प्रकरण जरा 'वेगळंच' हाेतं.!
  निर्मात्यानं माझी ‘प्रमुख कलाकार’ आणि  म्हणून ओळख करून दिली, तसं या ‘मॅडम’ नं आपली ओळख सांगायला सुरूवात केली. ‘मी याआधीही एका चित्रपटाच्या शूटींगसाठी पंढरपुरात आले हाेते’ असंही सांगितलं. इथवर ठिक हाेतं हाे! या ‘मॅडम’ नं पुढं सांगितलं, ‘मी ‘जखमी पाेलीस’ या सिनेमाची हिराॅईन आहे.’ .. मी उडालाेच! या चित्रपटाचा हिराे तर मी.. त्यात कथा पटकथा संवाद लेखक मीच अन् कास्टींगही मीच केलेलं... तरीही..!? माझ्याच चित्रपटात ही बया हिरॉइन होती आणि मलाचा माहित नाही? ऐकत होतो आपला !

 असे बरेच भेटतात आणि कवडीची अक्कल नसताना भाव खातात असे खूप अनुभव आहेत. फालतू मिमिक्री करणाऱ्या एका कथित कलाकाराला मी एक गंभीर भूमिका दिली आणि याने कॅमेऱ्यासमोर जमेल तेवढी माकडचेष्टा सुरु केली. कधी कधी अत्यंत फालतू माणसालाही एखादा छोटासा रोल मिळून जातो, हा रोल असतो कुठंतरी गर्दीत उभं राहण्याचा किंवा एखादं वाक्य बोलण्याचा ! तेवढ्यावर सुद्धा जॅम तंतरेलेली असते यांची ! सेटवर दिग्दर्शकाच्या शिव्या खातात आणि बाहेर फुकटचा भावही खातात ! अभिनयाचा कवडीचा गंधही नसतो यांच्याजवळ ! मुर्खांच्या गर्दीत मात्र हे फार 'मोठे कलाकार' असतात! असो, आपल्याला काय करायचंय म्हणा ! उथळ पाण्याला खळखळाट फार असतोच ना!  
  तर  एकूण या ‘मॅडम’चा आवाका लक्षात आलेलाच हाेता. अभिनयातलं तर या बाईसाहेबांना काहीच कळत नाही याचीही जाणाीव झाली हाेती.. मी संतापताेय की काय, याची भीती निर्मात्यांना हाेती. ते मला दुर्लक्ष करण्याबाबत खुणावत हाेते.  अधून मधून या अभिनेत्रीचा फाेन वाजायचा आणि ती बाेलायची, ‘अरे शाहरूख, मै शूटींग के लिए पंढरपूर आई हूँ .. बाद मे बात करेंगे!’ आम्हाला वाटलं, हा शाहरूख असेल कुणी संबंधातला.. फाेन बंद करून पुन्हा आमच्यावर छाप पाडण्यासाठी काही बाेलायची. या शाहरूखचा पुन्हा पुन्हा फाेन यायचा अन् आमचं बाेलणं थांबायचं! त्या ‘शाहरूख’कडं आम्ही काही जास्त लक्ष दिलं नाही.  तेंव्हा या ‘मॅडम’ म्हणाल्या, ‘शाहरूख खान आहे हाे...त्याच्या साेबतच माझं शूटींग हाेतं पण--!’ तेवढ्यात पुन्हा त्यांचा फाेन वाजला... मनात म्हटलं, ‘पुन्हा शाहरूख खान..’ पण तसं काही नव्हतं. आता ती ‘सलमान’ शी बाेलत हाेती. ‘अरे सलमान, अभी मै मिटींग मे हूँ . बाद में बात करेंगे..’ खरं तर या महामायेचा राग येण्यापेक्षा हसू यायला लागलं हाेतं. निर्माते जाम अस्वस्थ.. कुठं मी चिडताेय की काय अन् उद्याचं शूटींग बारगळतंय की काय? या मॅडमनं पुन्हा सांगितलं, ‘सलमान खान होता ...फाेनवर माझ्याशी बाेलल्याशिवाय एक दिवस जात नाही त्याचा!’ आता काय बोलायचं! काय रूप, काय रंग, काय अक्कल, आणि काय भाव खाणं !
    आता मलाच काही करावं लागणार हाेतं.. आणि केलंही! मग काय या ‘मॅडम’ चा अन् तिच्या फाेनचाही आवाज बंद! तोंडावरचा असली आणि नकली रंगही उडाला.  निर्मात्यांना हळूच सांगितलं, बाथरूममध्ये जा आणि मला फाेन करा.. मलाही महान अभिनेता अमिताभ बच्चन साहेबांचा फोन येणार  होता ... माझा फाेन वाजला तसा मी फाेनवर म्हणालाे, ‘अरे,बच्चन साहब,.. जी अभी मै मिटींग में हूँ, बाद में बात करेंगे.. साॅरी आमिताभजी..!!’

                           - अशाेक गाेडगे

'दुनियादारी' या वेब पोर्टलवरून प्रसिद्ध होणारा मजकूर, अथवा त्याचा काही भाग, छायाचित्र, ध्वनिचित्रफीत आदी कशाचाही पूर्वपरवानगीशिवाय वापर करू नये. तसे निदर्शनास आल्यास कॉपीराईट कायद्याचा भंग समजला जाईल. सर्व हक्क राखून ठेवलेले आहेत. - अशोक गोडगे, सोलापूरे नगर, टाकळी रोड, सोलापुरे नगर पंढरपूर भ्रमणध्वनी : ९४२१०२८०८०, ७०२००००६३७ . ,

Comments

Post a Comment